डोंबिवलीतील भागशाळा मैदानातून हिंदू नववर्ष स्वागत शोभायात्रेला भव्य स्वरूपात सुरुवात झाली आहे. या शोभायात्रेत शेकडो महिला आणि तरुणाई पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली असून ढोल-ताशांचा गजर, लेझीम, वारकरी सांप्रदाय यांचा जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे. संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, साईबाबा, विठ्ठल यांच्या वेशभूषेत लहानग्यांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग आहे. यात्रेत १४ ढोल पथकांसह ८० हून अधिक सामाजिक संस्था सहभागी झाल्या असून, पर्यावरण जनजागृतीसाठी विशेष संदेश दिला जात आहे. ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात डोंबिवलीकरांनी नववर्षाच्या स्वागतासाठी एकत्र येत परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडवले आहे.