भिवंडी : तालुक्यातील 121 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न
भिवंडी तालुक्यातील 121 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी कामतघर येथील वऱ्हाळ माता मंगल कार्यालय याठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. तालुक्यातील 40 ग्रामपंचायती या अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असल्याने उर्वरित 81 ग्रामपंचायतींपैकी 6 अनुसूचित जाती,8 अनुसूचित जमाती,22 नागरिकांचा मागास प्रवर्ग,तर उर्वरित 45 या सर्वसाधारण यांच्यासाठी राखीव असून यामध्ये 40 सरपंचपद ही महिलांसाठी राखीव असून अनुसूचित क्षेत्रातील 40 पैकी 20 सरपंच पदे ही सुध्दा महिलांसाठी राखीव असणार आहेत. ही सरपंच आरक्षण सोडत पार पाडण्यासाठी नायब तहसीलदार विशाल इंदुलकर,किरण केदार,अतुल नाईक,संतोष आगिवले,शैलेश भोजने,निवडणूक विभागाचे मेजर पवार यांनी विशेष मेहनत घेतली.तर या सोडत प्रकरणी उत्सुकता ताणलेली असताना असंख्य गावातील इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती.