भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. “आमच्या पक्षाचा वॉर रूम म्हणजे सरकारच्या योजना आणि संघटनाचं कामकाज पाहण्यासाठी असलेली यंत्रणा आहे. आम्हाला पक्ष कसा चालवायचा हे संजय राऊत शिकवणार नाहीत,” असा जोरदार टोला त्यांनी लगावला.
“एक लाख व्हॉट्सअॅप ग्रुप ही BJPची संघटनात्मक ताकद”
बावनकुळे म्हणाले, “भंडाऱ्यात आमच्या पक्षाची बैठक होती. निवडणुकीच्या काळात अनेक निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बातम्या येतात. आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम, कमेंट्स आणि जनतेच्या प्रतिक्रिया आमच्या वॉर रूमद्वारे तपासल्या जातात.”
ते पुढे म्हणाले, “आमचं वॉर रूम सरकारी योजना मॉनिटर करतं आणि त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून होतं. आमच्याकडे सुमारे एक लाख व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत — ही आमच्या पक्षाची संघटनात्मक ताकद आहे. या ग्रुप्समधून आम्ही कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधतो, त्यांच्या अडचणी जाणून घेतो आणि योजनांचं फीडबॅक घेतो.”
“पक्षाचं काम आमच्या पद्धतीनेच; राऊत ठरवणारे कोण?”
बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली. “आमच्या पक्षात आमचे स्वतःचे बूथप्रमुखांचे व्हॉट्सअॅप ग्रुप आहेत, जे आमच्या वॉर रूमशी जोडलेले आहेत. त्यामुळे आमचं कामकाज पारदर्शक आणि संघटित आहे. आमचा सोशल मीडिया सेल रोज काम करतो, कार्यकर्त्यांशी संवाद ठेवतो,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “आमच्या पक्षाचं काम आम्ही कसं करावं हे संजय राऊत ठरवणार कोण? त्यांना हवं असेल तर त्यांनी येऊन गुन्हा दाखल करावा.”
सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया
बावनकुळे यांनी सातारा येथील डॉक्टर आत्महत्येच्या घटनेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी घटना पाहिलेली नाही, पण या प्रकरणात तातडीने कारवाई आणि सखोल चौकशी झाली पाहिजे.”