शेतकऱ्यांचे कर्ज माफ व्हावे यासाठी बच्चू कडु यांच्यासह अनेक जण प्रयत्नशील असताना, अजून एका शेतकऱ्याने पत्नीसह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात असणाऱ्या भरोसा येथील शेतकरी दांपत्याने शेतातच निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शेतकऱ्याचे नाव गणेश थुट्टे तर पत्नीचे नाव रंजना थुट्टे आहेत. दोघांनी शेजारी-शेजारीच असलेल्या निंबाच्या झाडाला गळफास घेतला. थुट्टे दाम्पत्याने हे टोकाच पाऊल का उचललं, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, सातत्याने शेतीत होणारे नुकसान आणि हुमणी अळीने ते चिंतेत होते, त्यातचून आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा परिसरात होत आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर अंढेरा पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत. मृतांचे पार्थिव खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.