मान्सूनपूर्व पावसामुळे शेगाव तालुक्यात हाहाकार; विद्युत खांबे कोसळली, झाडे उन्मळून पडली
मागील आठवडाभरापासून बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांमध्ये कोसळणाऱ्या मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची, शेतकऱ्यांची अक्षरशः दाणादाण उडालेली आहे. दररोज सायंकाळी कुठे ना कुठे मुसळधार पावसाची हजेरी राहत असल्यामुळे उन्हाळी शेती पीक आणि फळबागांना मोठा फटका बसत आहे. यामध्ये मंगळवारी सायंकाळ पासून रात्री उशिरापर्यंत शेगाव तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे आणि सुटलेल्या सुसाट वाऱ्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेगाव ते वरवट मार्गावर असलेल्या कालखेड, मनसगाव, आडसूळ, झाडेगाव, येऊलखेड या शिवारात अनेक झाडे म्हणून पडली होती. यामुळे रात्री या भागामध्ये वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही झाल्या. दुसरीकडे या भागातील विद्युत पुरवठा करणारी इलेक्ट्रिक खांबे कोसळल्याने अनेक गावे रात्रीपासून अंधारात आहेत.