छत्रपती संभाजीनगर : सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी आले, तलावात बैल धुतांना दोघांचा बुडून मृत्यू
मामाच्या गावी आलेले तिघे बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावात गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रसंगावधान राखत एका १८ वर्षीय तरुणीने तलावात उडी घेऊन १३ वर्षीय मुलाला वाचवले आहे. ही घटना शनिवारी सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे घडली आहे. मामाच्या गावी आलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यासाठी तर धाडस करून मुलाचा जीव वाचवणाऱ्या मुलीचं कौतुक होत आहे.
अखिल शकील पठाण (वय 18, राहणार नांदगाव तांडा), रेहान भिकन शेख (वय 15 सातगाव डोंगरी तालुका पाचोरा) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. तर शाकीप कलंदर पठाण (वय 13 राहणार घाटनांद्रा तालुका सिल्लोड) असं जीव वाचलेल्या मुलाचे नाव आहे.
याप्रकरणी स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने रेहान भिकन शेख हा सोयगाव तालुक्यात नांदगाव तांडा येथे राहणाऱ्या शकील पठाण यांच्याकडे आला. तर, सकीप अलकंदर पठाण हा त्याच्या बहिणीकडे आला होता. दरम्यान, अखिल, रेहान, साकिब हे तिघे भिकन शेख यांना न सांगताच बैल धुण्यासाठी गावाजवळील साठवण तलावावर गेले.