छ. संभाजीनगर : आता गुगल-पे, फोन-पेद्वारे,भरता येणार मालमत्ता कर ; महापालिकेकडून सुविधा उपलब्ध

छ. संभाजीनगर : आता गुगल-पे, फोन-पेद्वारे,भरता येणार मालमत्ता कर ; महापालिकेकडून सुविधा उपलब्ध
  • MG News
  • मे 26 2025

Share on  

छ. संभाजीनगर : आता गुगल-पे, फोन-पेद्वारे,भरता येणार मालमत्ता कर 

      महापालिकेने मालमत्ता कर, पाणीपट्टी ॲपद्वारे ऑनलाइन भरणा करण्याची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. मात्र, आता मालमत्ताधारकांना गुगल-पे, फोन-पेवरूनही या कराचा भरणा करता येणार आहे, अशी माहिती मनपा प्रशासक तथा आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिली. प्रशासनाने सामान्य करामध्ये १० टक्के शुल्क सवलत दिल्याने महापालिकेच्या तिजोरीत ४० कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे प्रशासकांनी सांगितले.
    मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीचे ७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. गतवर्षी प्रशासनाला ५०० कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट होते. परंतु, त्यातुलनेत केवळ १८५ कोटी रुपयांचीच वसुली करण्यात यश आले होते. त्यामुळे प्रशासकांनी संपूर्ण कर वसुली विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचीच उचलबांगडी केली. त्यांच्या जागी नव्यांना संधी देण्यात आली आहे. यात एकही कंत्राटी नसून सर्व महापालिकेचे कायमस्वरूपी कर्मचारी आहेत. एप्रिलपासूनच मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीकडे लक्ष केंद्रीत केले आहे. मालमत्ता कर संकलन व निर्धारक अधिकारी तथा उपायुक्त विकास निवाळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कर वसुलीसाठी कर्मचार्‍यांवर जबाबदारी सोपवली आहे. कंत्राटी कर्मचार्‍यांना कर वसुलीसाठी न ठेवता कायमस्वरूपी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासोबतच ऑनलाईन प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी वेबसाईडमध्ये बदल करून अ‍ॅपमध्ये देखील आणले आहे. त्यासोबत गुगल-पे आणि फोन-पेद्वारे मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुगल-पे अ‍ॅपमध्ये महापालिकेचे नाव टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा, तसेच मालमत्ता क्रमांक टाकून कराची रक्कम जमा करावी.
    १ एप्रिल ते २३ मे या ५३ दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीतून ४० कोटींचा महसूल जमा झाला आहे. यात ३८ हजार ८५१ मालमत्ताधारकांनी ३६ कोटी २३ लाख रुपये मालमत्ता कर आणि ४ कोटी ५३ लाख रुपयांची पाणीपट्टी भरणा केली आहे. कर भरण्यासाठी मे अखेरपर्यंत दहा टक्के सामान्य करामध्ये सूट दिली जाणार आहे.

संबंधित बातम्या