सध्या श्रावण महिना सुरु आहे.या महिन्यात भगवान शंकराचे दर्शन घेणे मोठे पुण्याचे काम समजले जाते.त्यामुळे या काळात महादेवाच्या ज्योर्तिलिंगाच्या मंदिरातील गर्दी मोठ्या प्रमाणात वाढते. मात्र नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरानंतर आता पुणे जिल्ह्यातल्या भिमाशंकर मंदिरात भाविकांना दर्शन घेताना पावसाच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागतोय.वारंवार पुरातत्व खात्याला सांगून मंदिराची दुरुस्ती न केल्याने दोन्ही मंदिराला मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यामुळे भाविकांना पावसाचा मारा सहन करत महादेवाचे दर्शन घ्यावे लागत आहे
भिमाशंकर परिसरात गेल्या २४ तासापासून मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसात भाविकांसाठी मंदिर म्हणजे एकमेव आश्रयस्थान आहे. मात्र मंदिराच्या सभामंडपात पाणी गळती होत असल्याने शेकडो भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.मंदिराच्या सभामंडपाच्या छतावरून थेट मंडपात पाणी झिरपत असून भाविक भिजत दर्शन घेत आहेत. पावसाचा अंदाज असूनही वेळेत डागडुजी न केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मंदिर व्यवस्थापन आणि पुरातन विभागाच्या हलगर्जीपणामुळे पावसात चिंब झालेल्या भाविकांना या गळतीचा त्रास सहन करावा लागत आहे.
त्र्यंबकेश्वराच्या मंदिरातही गेल्या काही दिवसांपासून गळती सुरू आहे. मंदिराला लागलेली गळती थांबायचं नाव घेत नाही आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे मंदिराला गळती लागली आहे. चोल आणि नागरी शैलीतील या मंदिराचा १७५४ साली माधवराव पेशवे यांनी जीर्णोद्धार केला होता.देवस्थान आणि विश्वस्तांकडून पुरातत्व विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. पुरातत्व विभागाकडून मात्र पाठपुरावा करूनही मंदिराची दुरुस्ती करण्यात आली नाही.पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिर प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.