एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना संबंधित लोकप्रतिनिधीला त्याबाबतची कल्पना पोलिस अधिकाऱ्यांनी देणे अथवा पत्रव्यवहार करणे क्रमप्राप्त असते. मात्र असे न करता
कोरेगाव पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने कोणतीही कल्पना न देता आमदार शशिकांत शिंदे यांच्या ल्हासुर्णे येथील निवासस्थानी बेकायदेशीररीत्या प्रवेश करून चौकशी केल्याप्रकरणी कोरेगाव पोलिस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला. मात्र, जुजबी उत्तरे दिली जात असल्याने पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे, की कोरेगाव पोलिस ठाण्यात बुधवारी दुपारी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने एका पोलिस कर्मचाऱ्याने बेकायदेशीररीत्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. वास्तविक पाहता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना संबंधित लोकप्रतिनिधीला त्याबाबतची कल्पना पोलिस अधिकाऱ्यांनी देणे अथवा पत्रव्यवहार करणे क्रमप्राप्त असते.
यावेळी पक्षाचे युवा नेते साहिल शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, कोरेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. पांडुरंग भोसले, कोरेगाव नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनवडे आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.