राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्या आवाहनानुसार राज्यभर चक्काजाम करण्यात येत आहे. चोपडा तालुक्यातील बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गावर आज प्रहार संघटनेसह शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले.
यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. दिव्यांगांना दरमहा ६ हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे. शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे" अशा घोषणा आंदोलकांनी दिल्याचक्काजाममुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली. परिणामी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांना बसमधून उतरून पायी प्रवास करावा लागला. या आंदोलनात प्रहारचे रवींद्र पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह अनेक स्थानिक शेतकरी व दिव्यांग बांधवांनी सहभाग घेतला. त्यांनी आपल्या भावना प्रसारमाध्यमांपुढे मांडल्या.कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, संतोष पारधी, चक्रधर पवार, हर्षल पाटील यांच्यासह पोलीस दलाने चोख बंदोबस्त तैनात केला होता.