लहान सौरउर्जा प्रकल्पही मोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे - महापालिका आयुक्त अभिनव गोयल
छोटे, छोटे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पही मोठमोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी आज केले. लोकसहभागातून महापालिकेच्या 14 शाळांवर उभारण्यात आलेल्या सौरऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे आज एकाचवेळी आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे. परंतु, देशाचा प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही तोपर्यंत हे लक्ष्य गाठता येणार नाही आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये बसविण्यात आलेले हे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प त्यामध्ये खारीचा वाटा उचलतील असे सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती, संस्था, बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचे आयुक्त अभिनव गोयल यांनी आभार मानले.
महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील 14 शाळांमध्ये 50 किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून, त्यासाठी 25 लाखांहून अधिक खर्च आला आहे. या कार्यक्रमाला शहर अभियंता अनिता परदेशी, उपआयुक्त संजय जाधव, रमेश मिसाळ, शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.