सिडको, ता. ९ : नाशिक महानगरपालिका आरोग्य विभागातील आशा गट प्रवर्तक आयटक संघटनेच्या अधिवेशनात कांचन पवार अध्यक्ष आणि संगीता सुरंजे सचिव म्हणून निवडण्यात आल्या. अधिवेशनात आशा ताईंच्या वेतनवाढी, शासकीय कर्मचारी दर्जा आणि पेन्शन यांसह विविध मागण्यांवर चर्चा झाली.
नाशिक महानगरपालिकेत ७०० हून अधिक आशा कार्यरत आहेत, ज्या बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. यावेळी मार्गदर्शन करताना मनपा आरोग्य अधिकारी डॉ. तानाजी चव्हाण यांनी आशा ताईंच्या कार्याचे कौतुक केले.
अधिवेशनात दरमहा २६,००० रुपये किमान वेतन, १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, आणि शासकीय सेवेत समावेश या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या. तसेच नाशिक महापालिकेने मालेगावप्रमाणे २,००० रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशीही मागणी झाली.
अधिवेशनात संविधान प्रचार मोहिमेंतर्गत १ लाख घरांपर्यंत संविधान प्रस्तावना पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. विविध मागण्यांसाठी पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. तानाजी चव्हाण यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून झाले. अधिवेशनात अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग, सावित्रीची ओवी आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर करण्यात आले.
नाशिक : अधिवेशना प्रसंगी बोलताना डॉ. तानाजी चव्हाण