विजयकुमार घाडगे यांना गेल्या रविवारी झालेल्या माराहाण प्रकरणी मुख्य संशयित सुरज चव्हाण हे बुधवारी पहाटे लातूरच्या विवेकानंद पोलिस स्टेशनमध्ये शरण आले. मुंबईत विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहातच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.रविवारी लातूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना या संदर्भात विजयकुमार घाडगे यांनी निवेदन दिले यावेळी पत्तेही उधळण्यात आले होते. या घटनेनंतर काही वेळातच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी घाडगे यांना बेदम मारहाण केली होती.
घाडगे यांच्या फिर्यादीवरून लातूरच्या विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण यांच्यासह लाला सुरवसे, शुभम रेड्डी, अमित क्षीरसागर, ताज शेख, अभिजित सगरे पाटील, सिद्दिक मुल्ला, अहमद शेख, वसिम मुल्ला, रवी धुमाळ व राजू बरगे यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता. यात पोलिसांनी ताज शेख, अहमद शेख वगळता सर्व संशयितांना अटक करून नंतर जामिनावर सुटका केली होती. बुधवारी सूरज चव्हाण पोलिसांना शरण आले.
सूरज चव्हाण यांच्यावर छावा संघटनेचे कार्यकर्ते नजर ठेवून आहेत, हे लक्षात आल्याने पोलिस सतर्क होते. यामुळे चव्हाण दिवसा येण्याचे टाळत बुधवारी पहाटे साडेचारला वाहनातून चव्हाण विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांना याची अगोदरच माहिती होती. त्यामुळे सर्व वरिष्ठ अधिकारी साडेतीन ते चारपासूनच पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. याची गुप्तता पाळण्यात आली होती. एक-दीड तासात ही प्रक्रिया पूर्ण करून सूरज चव्हाण यांनी लातूर सोडले.