मुंबई,नाशिक,दि.१२ मार्च:- पुणे, नागपूर या शहरांच्या धर्तीवर नाशिकमध्ये देखील लवकरात लवकर मेट्रो धावायला हवी.मेट्रोच्या कामांमुळे पुरातन मंदिरे, जुनी घरे यांची कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी सभागृहात केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते विधानपरिषदेच्या सभागृहात बोलत होते.
अर्थसंकल्पावरील चर्चेवर आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, कर्नाटकातील होजिगिरी येथील शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात यावे. उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराजमध्ये केलेले महाकुंभचे यशस्वी आयोजन हे धार्मिक पर्यटनाचे आदर्श उदाहरण आहे. त्याच धर्तीवर, महाराष्ट्र सरकारने देखील नाशिकमध्ये २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७७६-१७९५ दरम्यान स्थापन केलेले कुंड नाशिक महापालिकेने केलेल्या काँक्रिटीकरणामुळे बुजवले गेले आहे. येत्या ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीदिनी या कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. नार-पार खोऱ्यातील पाणी नाशिक जिल्ह्यासाठी मिळाल्यास नाशिकच्या शेतीला मोठा लाभ होईल असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे किमान आधारभूत किंमतीच्या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच मोठ्या राज्यातील महानगरांमध्ये क्रीडांगणे, हॉस्पिटल्स, बागा यासाठी मोकळ्या जागा शिल्लक नाहीत. त्यामुळे नवीन इमारतींना परवानगी देताना सरकारने अशा सुविधांसाठी जागा ठेवण्याची अट घालावी अशा मागण्या त्यांनी केल्या.
तसेच महायुती सरकारच्या वतीने अर्थसंकल्पात विविध चांगल्या योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील सर्व घटकांसाठी सर्वसमावेश अशा तरतुदी करण्यात आलेल्या आहे. या निर्णयांबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आमदार पंकज भुजबळ यांनी आभार मानले.