पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त शहर व परिसरातील महादेवाची मंदिरांवर आकर्षक रोषणाईने सजली आहेत. आज दिवसभर महापूजा, रुद्राभिषेक, महाप्रसाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.कपालेश्वर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. श्रावणमासानिमित्त कपालेश्वर पंचमुखी मुखवटा दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. या सोहळ्यास १३३ वर्षांची परंपरा आहे. पंचवटी महादेव मुकुटाची वर्षभरात श्रावणी सोमवार, सोमवती अमावस्या महाशिवरात्र या दिवशी पालखी सोहळ्याच्या रुपाने पूजन केले जाते. दुपारी मंदिरात मुखवटा आणून पूजा करुन फुलांनी सजवलेल्या पालखीत त्यास स्थानापन्न केले जाते. दुपारी ४ वाजता सवाद्य मिरवणुकीस सुरुवात हाेणार आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवारी कपालेश्वर मंदिर, रामकुंड परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. २५ जुलै ते २३ ऑगस्टदरम्यान श्रावण मास साजरा होत आहे. वाहतूक मार्गात शहर वाहतूक शाखेच्या युनिट एककडून बदल करण्यात आला आहे. सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत या भागातील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहे.मालेगाव स्टॅण्ड, खांदवे सभागृह, सरदार चौक, ढिकले वाचनालयाकडून श्री कपालेश्वर मंदिराकडे येणारा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद असणार आहे. केवळ पोलिस सेवेतील वाहने, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांनाच या भागात प्रवेश असणार आहे. हा बदल श्रावण महिन्यातील चारही सोमवार आणि शनिवारसाठी लागू असणार आहे. श्रावण सोमवारनिमित्त श्री कपालेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील देखील भाविक याठिकाणी येत असतात. त्यामुळे या भागात वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परिसरात येणाऱ्या भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, याकरिताच वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले आहे.