श्रावण महिन्यात भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता श्री त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टने आजपासून सुरु झालेल्या श्रावण महिन्यात भाविकांच्या सोयीसाठी विशेष दर्शन वेळा आणि नियोजन जाहीर केले आहे. विश्वस्त मंडळाच्या निर्णयानुसार शहरातील विविध भागांमध्ये हे नियोजन फलकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले आहे.श्रावण महिन्यात दररोज मंदिर दर्शनासाठी पहाटे ५:०० ते रात्री ९:०० या वेळेत खुले राहणार आहे.तर श्रावणी सोमवारी ही वेळ पहाटे ४:०० पासून सुरू होईल. स्थानिक ग्रामस्थांना विशेष सवलती दिल्या आहेत.त्यांना सकाळी मंदिर उघडल्यापासून १०:०० वाजेपर्यंत व संध्याकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत दर्शनाची संधी दिली जाईल. मात्र त्यासाठी स्थानिक असल्याचा पुरावा म्हणून ओळखपत्र बंधनकारक राहील. ग्रामस्थांसाठी उत्तर दरवाजातून प्रवेश देण्यात येईल.
धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजातून व देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजातून असेल. भाविकांसाठी गर्भगृह दर्शन बंद असणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ग्रामस्थांसाठी सात दिवस सकाळी ६:०० ते १०:०० या वेळेत पश्चिम द्वारातून प्रवेश मिळणार आहे.ट्रस्टने वातानुकूलित दर्शन रांगा, ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, शुद्ध पिण्याचे पाणी व प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत.
संपुर्ण श्रावण महिन्यात व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे. व्हीआयपी दर्शन पोळा झाल्यावर अर्थात २३ ऑगस्टनंतर सुरु करण्यात येईल.श्रावणमहिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी ब्रम्हगिरी डोंगराला प्रदक्षिणा मारणाऱ्या भाविकांची विशेष गर्दी होते. याशिवाय कुशावर्त स्नान, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधी दर्शन, नीलगिरी पर्वत दर्शनासाठी लाखो भाविक त्र्यंबकेश्वरला येतात ज्यामुळे दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र यातून अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी केंद्रीय स्तरावरून, राज्यस्तरावरून अथवा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्राप्त होणार्या राज शिष्टाचार संबंधी लेखी पत्रव्यवहाराच्या व्यक्तींचा अपवाद करण्यात आला आहे.