राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानंतरही सोलापूर शहरातील बहुतेक शाळा- महाविद्यालयांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. शहर पोलिसांकडील दामिनी पथकांच्या अपुऱ्या संख्येमुळे 'स्त्रीयांची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत.सोलापूर शहरातील विभाग एकच्या अंतर्गत जेलरोड, जोडभावी पेठ, एमआयडीसी व फौजदार चावडी अशी चार पोलिस ठाणी आहेत. तर विभाग-दोनअंतर्गत सदर बझार, विजापूर नाका आणि सलगर वस्ती पोलिस ठाण्याचा परिसर येतो. दोन्ही विभागासाठी प्रत्येकी एक दामिनी पथक आहे. प्रत्येक पथकात केवळ सहा महिला अंमलदार आहेत. सोलापूर शहराच्या हद्दीत ८० पेक्षा जास्त महाविद्यालये आणि सुमारे १२० कनिष्ठ महाविद्यालये आहेत.
शहरातील बागा, बस थांबे, खेळाची मैदाने, शाळा-महाविद्यालये व निर्मनुष्य रस्ते, अशा ठिकाणी दामिनी पथकाच्या भेटी असतात, पण अपुऱ्या संख्येमुळे त्यांना दररोज त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लक्ष देता येत नाही. त्यामुळे शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातील कॅन्टिनवर थांबणारे टवाळखोर मुलींना त्रास देतात, असे चित्र आहे