हार्डवर्क, स्मार्टवर्क आणि नेटवर्क या त्रिसूत्रीने यश निश्चित : सोनाली गोराडे
नाशिक : प्रत्येकामध्ये क्षमता असते. स्वतःला ओळखून क्षेत्र निवडलं आणि हिमतीने पाऊल टाकलं तर आपल्यासाठी मार्ग खुले होत जातात. हार्डवर्क, स्मार्टवर्क आणि नेटवर्क यांचा मेळ बसवण्याची क्षमता जर विकसित केली आणि वेळेसंह टीमचे व्यवस्थापन व्यवस्थित सांभाळलं तर कुठलाही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी फार वेळ लागत नाही. जिकरीचं होत नाही.असे प्रतिपादन सुमागो इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडच्या सीईओ सोनाली गोराडे यांनी केले. त्या मराठा उद्योजक कक्षाच्या वतीने जागतिक महिला दिन सप्ताह निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त विनिता सोनवणे तर प्रमुख अतिथी म्हणून नाशिक जी.प. च्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ, उद्योजिका सोनाली गोराडे आढाव,रश्मी हिरे, जिजाऊ ब्रिगेडच्या माजी अध्यक्षा माधुरी भदाणे, डॉ स्नेहल देसले आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ देसले यांनी महिला ही परिवाराची आधारस्तंभ आहे ती जर सुदृढ असेल तर परिवार सुदृढ असतो. महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे अधिकाधिक जागृत राहून लक्ष दिलं तर संपूर्ण परिवार तंदुरुस्त ठेवून सांघिक प्रगती साधता येते असे सांगितले.
उपस्थित महिला उद्योजक आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना डॉ. वर्षाताई फडोळ म्हणाल्या, मुलींनी एका चाकोरीत अडकून न राहता बाहेरच्या जगातले अनुभव घेत आपण ठरवलेली गोष्ट करू शकतो हा आत्मविश्वास विकसित केला आणि सकारात्मक विचारधारा अंगी बाळगली तर यश आपल्यापासून दूर राहत नाही. प्रत्येक व्यक्तीला अशक्य ते शक्य करण्यासाठी निसर्गाने शक्ती दिली आहे मात्र आमच्यातला न्यूनगंड हाच मोठा अडथळा आम्हीच निर्माण करतो आणि म्हणून बाहेरच्या जगात आम्ही कमी पडतो. हा न्यूनगंड दूर करून आत्मविश्वासाने आपलं ध्येय गाठण्यासाठी पुढे आलं पाहिजे असे मौलिक विचार नाशिक जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षाताई पडोळ यांनी येथे व्यक्त केले.
यावेळी यशस्वी उद्योजिका सारिका पाटील, मनीषा मोरे, यमुताई पाटील, मोनाली साहेबराव साळुंके, मोनालि वाघ, वैशाली वाघ आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभवी देसले यांनी तर सुत्रसंचालन स्मिता आहेर यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उद्योजिका आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य प्रशांत पाटिल, मराठा उद्योग कक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश शिंदे, कार्याध्यक्ष दीपक भदाणे, सचिव उल्हास बोरसे, संदीप सोमवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.