भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरात एका मोकळ्या मैदानात गांजाची तस्करी करण्याऱ्या मनसेच्या भिवंडी शहर उपाध्यक्षला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.कुमार व्यंकटेश पुजारी (वय 34) असे पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 3 किलो 960 ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 1 लाख 28 हजार रुपये असून पोलिसांनी आरोपीकडून गांजा, मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त केली आहे.
पुजारी हा स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची साठवणूक आणि विक्री करत असल्याची माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली असून, त्याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुमार पुजारीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे? इतर टोळ्यांशी याचा काही संबंध आहे का? याचा सखोल तपास भिवंडी गुन्हे शाखा करत आहे.