उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पहाटे ६ वाजता हिंजवडी आयटी पार्क, माण आणि मारुंजी परिसराचा आकस्मिक दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला. अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांमुळे हिंजवडी परिसराची बदनामी होत असल्याचा संताप व्यक्त करत त्यांनी सरपंच आणि विकासकांना खडसावलं.
हिंजवडी आयटी पार्कमधील रस्त्यांचे रखडलेले काम, वाहतूक कोंडी आणि पाणी साचण्याच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी अजित पवारांनी यापूर्वी पीएमआरडीए, एमआयडीसी आणि पोलिसांना सूचना दिल्या होत्या. आजच्या दौऱ्यात त्यांनी या सूचनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. "विकासकामात अडथळा आणणाऱ्यांवर थेट 353 कलमांतर्गत गुन्हा दाखल करा, मग तो मी स्वतः असलो तरीही. अशा कडक सूचना त्यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पीएमआरडीए आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना दिल्या.
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांमुळे नाले बंद झाले असून, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. यामुळे बसेस आणि वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो, ज्यामुळे स्थानिक आणि आयटी कर्मचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. "तुम्ही पैसे कमवता, पण बदनामी आमच्या राज्याची होते!" असा थेट हल्ला अजित पवारांनी विकासकांवर चढवला. त्यांनी नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवण्याचे आणि रस्त्यांचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले.